मुंबई : मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले 1 लाख 18 हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये आढळून येत नाहीत अशा मतदारांनी आपले नाव असलेल्या संबंधित मतदारसंघात जाऊन आपले छायाचित्र दि. 8 जुलै, 2021 पूर्वी जमा करावीत अन्यथा त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येईल, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये छायाचित्रे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यांत मतदार यादी शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. दोषरहित व अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मार्फत दि. 01/01/2021 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीतील छायाचित्र नसलेल्या (Residual Voter) मतदारांच्या घरोघरी जावून भेटी देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी छायाचित्रे गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदार संघातील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदारसंघाचे कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
विहीत वेळेत आपण छायाचित्र जमा न केल्यास आपण संबंधित मतदार संघातून स्थलांतरित आहात अथवा आपण मतदारसंघात रहात नाही असे गृहीत धरण्यात येऊन आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. याविषयी आपणास काही शंका असल्यास किंवा या संदर्भात आपल्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास आपल्या संबंधीत जवळच्या मतदार संघ कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.