नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रशिया व युक्रेन यांच्यात अजूनही युद्ध सुरूच असताना युक्रेनच्या युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियन लष्कराचे आयएल-७६ हे विमान बुधवारी दुपारी सीमावर्ती बेल्गोरोडच्या बर्फाळ प्रदेशात कोसळले. यात, विमानातील युक्रेनचे सर्व ६५ कैदी व चालक दलाच्या ६ सदस्यांसह एकूण ७४ जण मृत्यूच्या दाढेत ओढले गेले. युक्रेननेच आमचे लष्करी विमान पाडले, असा आरोप रशियाने केला आहे. या घटनेवर युक्रेनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन व रशिया यांच्यात सध्या युद्धकैद्यांची आदलाबदली सुरू आहे. त्यासाठी युक्रेनचे ६५ युद्धकैदी बेल्गोरोडच्या सीमावर्ती भागात नेण्यात येत होते. परंतु याचदरम्यान सीमावर्ती बर्फाच्छादित ग्रामीण भागात रशियन सैन्य दलाचे आयएल-७६ हे विमान सकाळी ११ वाजता अचानक कोसळले. त्यानंतर, त्याचा भीषण स्फोट झाला. या घटनेत विमानातील कोणीही जिवंत वाचले नाही. सर्व ६५ कैदी व इतर ९ जण मरण पावले आहेत, असे बेल्गोरोड प्रदेशाचे गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लॅडकोव्ह यांनी सांगितले. विमान अपघाताचे वृत्त कळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांनी बेल्गोरोडच्या कोरोचान्स्की जिल्ह्यात अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली, अशी माहिती रशियाची शासकीय वृत्त संस्था ‘आरआयए नोवोस्ती’ने दिली. या विमान अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात, विमानाचा भीषण स्फोट झाल्याचे दिसत आहे.
कैद्यांना नेणारे विमान युक्रेनच्या सैन्याने पाडल्याचा आरोप रशियाच्या दोन खासदारांनी केला. युक्रेनच्या ६५ कैद्यांना घेऊन जाणाऱ्या विमानात चालक दलाचे ६ सदस्य व इतर ३ जण होते. ते सुद्धा यात मरण पावले आहेत. दुसरीकडे, युक्रेन विरोधी युद्धात रशियन हवाई दलातील विमाने अनेकदा अपघाताचे शिकार झाले आहेत.