ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एक लाखांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक ताब्यात !

सोलापूर : प्रतिनिधी

एका गुन्ह्याच्या तपासकामी मदत करणार असल्याचे सांगत एक लाख रुपयांची लाच स्वीकारत असताना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम प्रतापसिंग रजपूत यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यातील तक्रारदाराच्या एका मित्रावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रजपूत यांच्याकडे आहे. या तपासकामी मदत करण्यासाठी व तक्रारदाराच्या मित्रावर यापूर्वी असलेले गुन्हयांसंदर्भात प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी स्वतः सह तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी पोलीस उपनिरीक्षक रजपूत यांनी दर्शविली. ही रक्कम स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे, हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक श्रीराम घुगे, अतुल घाडगे, संतोष नरोटे, स्वामीराव जाधव, पोशि गजानन किणगी, श्याम सुरवसे यांनी ही कामगिरी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!