ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सपकाळांच्या वक्तव्यावरून राजकीय रणकंदन; मुलगी गार्गी उतरल्या मैदानात

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्रात सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याचे सांगितले जात असून, या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्यावर तीव्र टीका करण्यात येत आहे.

या टीकेला प्रत्युत्तर देताना सपकाळ यांची मुलगी गार्गी सपकाळ यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांचे मूळ वक्तव्य संदर्भासह होते. “शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केले,” असा त्या वक्तव्याचा आशय होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

गार्गी सपकाळ यांनी आरोप केला की, या प्रकरणात जाणीवपूर्वक गदारोळ उभा केला जात असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय वापर केला जात आहे. काही संघटनांनी शासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतान यांचेही फोटो लावण्याची मागणी केल्याच्या प्रश्नावर हे उत्तर देण्यात आले होते, असे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानांचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर दुटप्पी भूमिकेचा आरोप केला.

गार्गी सपकाळ यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या वडिलांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समता, न्याय व लोककल्याणाच्या विचारांवर ठाम विश्वास आहे. मात्र या प्रकरणानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या वक्तव्यावरून राज्यात काँग्रेस व भाजप यांच्यात आरोप–प्रत्यारोप सुरू असून, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!