ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राजकीय खळबळ : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली भाजप नेत्याच्या घरी जावून भेट !

नागपूर : वृत्तसंस्था

राज्यात नगरपालिका निवडणुका जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींनी वेग घेतला असून विशेषतः भाजपमध्ये उमेदवारीच्या वाटपावरून मोठा असंतोष उसळल्याचे चित्र स्पष्ट दिसू लागले आहे. अनेक ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षित तिकिटे न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून काहींनी तर पक्षपात आणि गटबाजीचा आरोप करीत राजीनाम्याची धमकी दिली आहे. या आंतरिक मतभेदांमुळे भाजपची आगामी निवडणूक लढत अधिक कठीण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश सदस्य आबिद सिद्दिकी यांच्या घरी अचानक भेट दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. सिद्दिकी हे काही दिवसांपासून उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा असून, पक्षाशी त्यांचा दुरावा वाढत असल्याची माहिती स्थानिक पातळीवर होती. पटोले यांनी घेतलेली प्रकृतीची विचारपूस ही केवळ औपचारिकता की राजकीय गणिताचा भाग? याबाबत तर्कवितर्क रंगू लागले आहेत. काँग्रेस अल्पसंख्याक मतदारांना साधण्यासाठी सक्रिय झाली आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल नगरपरिषद निवडणूकही तितकीच चर्चेत आहे. या रणसंग्रामात भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा उचलला असून, प्रचारसभेतील त्यांच्या एका विधानाने वातावरण अधिक तापले आहे. “ज्या वॉर्डातून काँग्रेसचा उमेदवार जिंकेल, तिथे भाजपकडून बोर्ड लावून नागरिकांना ‘विकास काँग्रेसकडून मागा’ असे लिहिले जाईल,” असे त्यांनी सांगितले. या वक्तव्यावर काँग्रेसने तुफान टीका करत मुनगंटीवार यांच्यावर विकासाच्या नावावर मतदारांना दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. सर्व मिळून, भाजपमधील अस्वस्थता, काँग्रेसची सक्रियता आणि वादग्रस्त विधाने या तिहेरी संगमामुळे नगरपालिका निवडणुका रंगात आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!