सोलापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. या नव्या युतीमुळे सोलापुरातील निवडणुकीचे गणित पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर महापालिकेसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अधिकृत युती झाली असून दोन्ही पक्ष ५१-५१ जागांवर निवडणूक लढवणार आहेत. या युतीची घोषणा शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांनी केली. नगरविकास आणि अर्थखाते आमच्याच पक्षांकडे असल्याने शहराच्या विकासासाठी निधीची अडचण भासणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपासोबत युती का होऊ शकली नाही, याबाबत बोलताना म्हेत्रे म्हणाले की, आम्ही भाजपकडे ४० जागांची मागणी केली होती. मात्र त्यांनी केवळ ८ जागा देण्याची तयारी दर्शवली. आम्ही २६ जागांवर ठाम होतो, पण पुढील चर्चा न झाल्याने भाजपासोबत युती शक्य झाली नाही. त्यानंतर अजित पवार गटासोबत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.
या युतीसाठी राष्ट्रवादीचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धराम म्हेत्रे यांच्यात सातत्याने चर्चा सुरू होती. भाजपसोबतची बोलणी रखडल्याने शिंदे गट अस्वस्थ होता. दुसरीकडे, भाजप-शिवसेना युती होणार या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने स्वबळावर लढण्याचा इशाराही दिला होता. मात्र २७ डिसेंबर रोजी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यानंतर या नव्या युतीच्या हालचालींना वेग आला आणि अखेर युती निश्चित झाली.
या घडामोडींमुळे सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलली असून आता महापालिकेच्या निवडणुकीत नेमकी बाजी कोण मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.