दुधनी : दुधनी शहरातील भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशान भूमीची अवस्था अंत्यत दयनीय झाली आहे. याकडे आता लक्ष कोण घालणार हा खरा प्रश्न आहे. शहरातील विविध सोयी सुविधांवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या नगर पालिकेला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही का ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
शहरातील भाजीपाला मार्केट जवळील हिंदू स्मशान भूमीमध्ये जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. सद्या जो रस्ता आहे तो पूर्ण चिखलमय झाला आहे. या स्मशान भूमीत दहनविधी करण्यास शेड उपलब्ध आहे. पण लोखंडी साचे उपलब्ध नाहीत. स्मशानभूमीच्या परिसरात काटेरी झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून आजूबाजूला कचऱ्याचे ढिगारे पडले आहेत.
स्मशानभूमीत प्रवेश करण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे.या रस्त्यावर माणसे चालणे मुश्किल झाले आहे.जड वाहने तर जाऊ शकत नाहीत. यामुळे अंत्यविधीला गेलेल्या नागरिकांना खूप वाईट अनुभव येत आहे.
हिंदू स्मशानभूमीच्या या दुरावस्थेमुळे सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुधनी नगर परिषदेने त्वरित याकडे लक्ष देण्याची गरज आहे.