मुंबई, वृत्तसंस्था
भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. याबाबत आता प्राजक्ता माळीने मौन सोडलं आहे. करुणा शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर प्राजक्ता माळी पहिल्यांदाच बोलली आहे. तसंच काल भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत प्राजक्ता माळीने माफीची मागणी केली आहे. याशिवाय तिने महिला आयोगाकडेही सुरेश धस यांची तक्रार केली आहे.
माझी आई मागच्या दीड महिन्यापासून नीट झोपलेली नाही. माझ्या भावाने त्याचं सोशल मीडिया अकाऊंट बंद केलं आहे. मी करुणा ताईंनाही विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही एक महिला आहात. तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठी उभ्या राहिल्या नाहीत आणि चिखलफेक करत राहिल्या तर कसं होईल?, असा सवाल प्राजक्ता माळीने विचारला आहे.
‘तुम्हाला जी माझ्याबद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे. तुमच्या माहितीचा स्त्रोत चुकीचा आहे, करुणा ताई. इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही, याचा मला विश्वास आहे. महिलांच्या बाबतीत तुम्ही संवेदनशील राहाल, अशी खात्री मी बाळगते आणि तुम्हाला विनंती करते’, असं प्राजक्ता माळी म्हणाली आहे. तसंच करुणा शर्मा यांना नोटीस पाठवली असल्याचंही प्राजक्ता माळीने सांगितलं आहे.