ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा : पण सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव !

मुंबई : वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमधील पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. पण सरकारमध्ये असे काही करण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना केली. जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे गत 22 तारखेला अतिरेकी हल्ला झाला. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह एकूण 22 पर्यटक मारले गेले. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. केंद्रानेही पाकला जशासतसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी सरकारमध्ये ठोस कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत असल्याचा आरोप केला आहे.

प्रकाश आंबेडकर येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून चोख प्रत्युत्तराची अपेक्षा होती. पण, सरकारकडून अशा कोणत्याही कारवाईचे संकेत दिसत नाहीत. सरकारने पाकसोबतचा सिंधू जलवाटप कराराला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. पण या करारांतर्गत येणाऱ्या नद्यांचे पाणी कसे अडवणार? कसे वापरणार? याचा खुलासा केला नाही. सरकार त्यांची खोली वाढवणार असल्याचे कळते. पण त्याहून अधिकचे पाणी कसे रोखणार? हा प्रश्न आहे. या कराराला वर्ल्ड बँकेची गॅरंटी आहे. त्याचे काय परिणाम होणार? हे ही सरकारने स्पष्ट केले पाहिजे.

पहलगाम हल्ल्यानंतर सर्वसामान्यांची तीव्र प्रतिक्रिया आहे. सरकारने एवढी शस्त्रास्त्रे विकत घेतली. विमाने विकत घेतली. पाणबुड्या विकत घेतल्या. भारतात लढाऊ विमाने तयार केली. त्या सर्वांचा उपयोग काय? असा प्रश्न सर्वसामान्य माणूस विचारत आहे. त्यामुळे सरकारने कागदोपत्री घोडे नाचवणे बंद करून या प्रकरणी काही ठोस कारवाई केली जाणार आहे का? हे सांगावे.

ते पुढे म्हणाले, सद्यस्थितीत भारतीय लष्कर पाकला चोख प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे. पण सरकारमध्ये निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही. सरकारने निर्णय घ्यावा. सरकारला लोकांचा पाठिंबा आहे. जनता सरकारच्या निर्णयासोबत राहील. जागतिक समुदायानेही दहशतवादाच्या मुद्यावर भारताला पाठिंबा दिला आहे. त्यानंतरही कोणताही कारवाई केली जात नाही.

सरकारने युद्ध नाही तर किमान दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळांवर हल्ले करावेत. ते उद्ध्वस्त करावेत. अतिरेक्यांचे अड्डे पाकच्या हद्दीत आहेत. पाकिस्तान हे अड्डे उद्ध्वस्त करत नसेल, तर ते तुम्ही करा. अशावेळी पाक काय करेल यापेक्षा आपण काय करू शकतो हे महत्त्वाचे आहे. यावर पहिल्यांदा विचार होण्याची गरज आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्यासंबंधी काहीजण हो म्हणतात तर काही जण नाही म्हणतात. पण येथील माध्यम व राजकीय नेते नरेटिव्ह सेट करत आहेत. ज्यांचा बळी गेला ते भारतीय होते. या हल्ल्यात ख्रिश्चन व मुस्लिमही मारले गेले. या हल्ल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. पण पंतप्रधान या बैठकीला गेले नाही. त्यावरुन ते किती गंभीर आहेत हे स्पष्ट होते. पंतप्रधानांनी या बैठकीला ब्रिफिंग करणे महत्त्वाचे होते. मी या बैठकीला असतो तर वॉकआऊट केले असते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!