अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पक्षाच्या युवासेना सोलापूर जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटचे युवा नेते प्रथमेश शंकर म्हेत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अक्कलकोट, बार्शी आणि सोलापूर दक्षिण या तीनही मतदारसंघांसाठी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत जिल्ह्याच्या युवक नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली.
या नियुक्तीपत्रात बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची निष्ठा व कार्यपद्धती आत्मसात करून संघटन वाढीसाठी कार्य करण्याचा संदेश देण्यात आला आहे. जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन संघटन विस्तार करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या निवडीनंतर युवा वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून युवा सेनेत नवचैतन्य आल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
नियुक्तीबद्दल युवासेना राज्य कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, राज्य सचिव किरण साळी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना नेते शंकर म्हेत्रे, संपर्क प्रमुख महेश साठे, महिला संपर्कप्रमुख अनिता माळगे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील आदींनी प्रथमेश म्हेत्रे यांचे अभिनंदन केले आहे.
पक्षात त्यांच्या सक्रिय भूमिकेमुळे हे पद योग्य व्यक्तिकडे गेल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. निवडीनंतर बोलताना प्रथमेश म्हेत्रे म्हणाले, ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा माझ्यावर जो विश्वास आहे, तो मी निष्ठा आणि प्रामाणिकपणे कार्यातून सिद्ध करणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीप्रमाणे युवाशक्ती एकत्र करून शिवसेना संघटन सोलापूर जिल्ह्यात अधिक बळकट करणे हेच माझे ध्येय आहे. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन विकास, संघटन आणि जनसेवा यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे त्यांनी म्हटले.