सोलापूर – सोलापुरात लोकमंगल फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या पूर्वतयारीला गती आली असून विविध समित्या नेमून जबाबदार पदाधिकाऱ्यांवर त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर होणार असलेला हा सोहळा विजापूर रोड भागातल्या शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. नुकतीच या सोहळ्यात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीला लोकमंगल समूहाचे प्रणेते आ. सुभाषबापू देशमुख यांनी मार्गदर्शन केले. सामूहिक विवाहांची गरज असणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. पण त्यांच्यापर्यंत या विवाह सोहळ्यांची माहिती पोचलेली नाही. तसेच ज्यांना माहिती आहे त्यांच्या मनात या विवाह सोहळ्याविषयी बरेच गैरसमज आहेत. तेव्हा हा समाजघटक नेमका हेरून त्यांच्यापर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोचविली पाहिजे असे आवाहन आ. देशमुख यांनी केले.
विवाह सोहळ्याचे संयोजक शशी थोरात यांनी आयोजनाची माहिती दिली आणि विविध समित्यांच्या जबाबदाऱ्या समजावून दिल्या. लोकमंगलचा सामूहिक विवाह सोहळा हा महाराष्ट्रात आदर्श सोहळा समजला जातो. त्यामुळे या समित्यांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम कसा अधिकात अधिक नेटका कसा होईल याचा विचार करावा, असे आवाहन थोरात यांंनी केले.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी या सोहळ्यातले सामान्य माणसाचे योगदान आणि सहभाग वाढावा यासाठी त्यांना विवाह सोहळ्यात सहभागी करून घ्यावे अशी सूचना मांडली. 11 हजार रुपये देणगी देणारांना एक कन्यादान करण्याची संधी द्यावी असे त्यांनी सुचविले. त्यावर या बैठकीतच तिघांनी एक कन्यादान करण्यासाठी अकरा हजार रुपयांच्या देणग्या जाहीर केल्या.