मुंबई : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियर सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. नागपूरच्या दौऱ्यावर असलेल्या मोदींनी या प्रसंगी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात करत नागरिकांना गुढीपाडवा आणि नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, वैद्यकीय शिक्षण मराठीतून उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सोयीस्कररीत्या वैद्यकीय शिक्षण घेता यावे यासाठी मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल.
मोदींनी यावेळी आरोग्य क्षेत्रातील विकासाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाखो नागरिकांना मोफत उपचार मिळत आहेत. देशभरात जवळपास एक हजार डायलिसीस सेंटर स्थापन करण्यात आली आहेत, जिथे मोफत उपचार दिले जातात. यामुळे नागरिकांचे हजारो कोटी रुपये वाचत आहेत. तसेच, एम्स संस्थांची संख्या वाढवण्यात आली असून वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.मोदींनी यावेळी जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले. याशिवाय, देशभरातील डायलिसिस सेंटर मोफत सेवा देत असून त्याचा लाभ हजारो नागरिक घेत आहेत.
पंतप्रधान मोदींनी नागपुरातील स्मृति मंदिराला भेट देऊन डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करत देशासाठी संघाने केलेल्या कार्याची प्रशंसा केली. मोदींनी आपल्या भाषणात नवरात्रीच्या सुरुवातीचे महत्त्व सांगितले. त्यांनी भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या अवतरण दिनाचे स्मरण केले तसेच डॉ. हेडगेवार यांच्या जयंतीचेही उल्लेख करत श्रद्धांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात नागपूरसाठी विविध महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि गरीब नागरिकांसाठी विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.