नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील वाराणसी या आपल्या मतदारसंघाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी दोनदिवसीय दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी शहरात विराट रोड शो घेतला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी मोदींवर पुष्पवृष्टी करत त्यांचे जंगी स्वागत केले.
या दरम्यान, एका रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देण्यासाठी मोदींचा ताफा थांबला व यातून मानवतेचे दर्शन घडले. जिल्ह्यातील कटिंग मेमोरियल येथे आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांशी मोदींनी चर्चा केली. त्यानंतर ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ प्रदर्शनाचे त्यांनी अवलोकन केले. या ठिकाणी मोदींनी चिमुकल्यांसोबत संवाद साधला. दरम्यान, आपल्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी नमो घाट येथे ‘काशी तामिळ संगमम’च्या दुसऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. याशिवाय वाराणसीत तब्बल १९,००० कोटी रुपयांच्या ३७ कल्याणकारी योजनांची पायाभरणी व उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे.