मुंबई :वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर तिखट हल्ला चढवला. पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त अजून सुकले नाही. त्यांचे घाव भरले नाहीत. पण त्यानंतरही केंद्र सरकार पाकशी क्रिकेट खेळून देशभक्तीचा व्यापार करत आहे, असे ते म्हणालेत.
उद्धव ठाकरे शनिवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आज एका उद्विग्न भावनेतून व विषन्न मनाने मी तुमच्याशी बोलत आहे. उद्या अबूधाबीत भारत-पाक क्रिकेट सामना आहे. अजूनही पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्या भारतीयांचे रक्त सुकले नाहीत. त्यांचे घाव भरले नाहीत. त्यानंतर भारतीयांना वाटले होते की, आपण आता पाकला जागेवर ठेवणार नाही. त्याचे दोन-तीन तुकडे करून टाकू. त्या दृष्टीने एक चढाई व युद्धही केले गेले. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव ठेवण्यात आले. मधल्या काळात आपल्या संरक्षणमंत्र्यांनी हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचे सांगितले. एकूणच ते जे काही वातावरण होते, ते आपल्यासाठी नव्हते. कारण, काही दिवसांनी किंवा वर्षांनी पाक आपल्या देशात अतिरेकी हल्ले करतो. त्यावेळी आपण सर्वजण जागे होतो. सरकारही चवताळून उठतो.
आपले सैनिक दरवेळी शौर्य गाजवतात. यावेळी तर आपण पाक पादाक्रांत करत असल्याचे चित्र होते. आपल्या सैनिकांनी शौर्याची पराकाष्ठा केली होती. पण अचानक अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवल्याची घोषणा केली. व्यापारासाठी युद्ध थांबवल्याचे ते म्हणाले. त्याच सुमारास भालाफेकीत भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या नीरज चोप्राने एका पाकिस्तानी प्रशिक्षकाला भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. तो प्रशिक्षक आला नाही. पण त्या नीरज चोप्रावर अंधभक्तांनी देशद्रोही असल्याची टीका केली होती. त्यावेळी त्याच्यावर काय बेतले असेल त्याची मला कल्पनाही करवत नाही.
पण आता आपण ज्या पाकबरोबर युद्ध पुकारले होते, त्याच पाकशी उद्या क्रिकेट खेळणार आहोत. आज असे अचानक काय झाले? ऑपरेशन सिंदूरनंतर जगभरात मोदींनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवले होते. त्यातून भारताची लढाई पाक पुरस्कृत दहशतवादाशी असल्याचा संदेश दिला होता. आता त्यांना नेमके काय झाले? ही देशभक्तीची थट्टा आहे. थट्टाच नव्हे तर देशभक्तीचा हा व्यापार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, या लोकांना व्यापारापुढे देशाचीही काही किंमत राहिली नाही. राजनाथ सिंह व अमित शहा यांनी आता पाकबरोबरचे युद्ध थांबवल्याची घोषणा करावी. विशेषतः नीरज चोप्रा व लष्करी अधिकारी सोफिया कुरेशी यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या अंधभक्तांचे व गधड्यांचे काय करणार? पाकवरील आपली भूमिका काय आहे? हे सांगावे. तुम्ही सांगाल तेव्हा पाक मुर्दाबाद म्हणायचे, तुम्ही पाकला मिठ्या मारणार आणि तिकडे जवान शहीद होणार. हे चालणार नाही. अतिरेक्यांनी तेव्हा भारतीय नागरीकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. आता भाजप व मोदींच्या लेखी हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही? हिंदुत्व व देशापेक्षाही त्यांना आज व्यापार मोठा वाटत आहे काय?