अक्कलकोटमध्ये स्व. अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
विकासदृष्टी, रोखठोक नेतृत्वाला उपस्थितांकडून सलाम
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल अक्कलकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्जेराव जाधव सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत विविध पक्षांच्या मान्यवरांनी स्व. अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी उपस्थितांनी स्व. अजित पवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन, दूरदृष्टी, रोखठोक स्वभाव, कामाशी असलेली प्रामाणिक निष्ठा, कार्यकर्ते जपणारा नेता म्हणून ओळख तसेच पुरोगामी विचारांशी असलेली बांधिलकी यावर मनोगत व्यक्त केले. स्व. अजित पवार यांनी राज्याच्या विकासासाठी घेतलेले निर्णय आणि सामान्य माणसाशी असलेली नाळ कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या शोकसभेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे आणि जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले होते. कार्यक्रमास वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दिलीप सिद्धे, अविनाश मडीखांबे, प्रा. प्रकाश सुरवसे, महेश हिंडोळे, बाबा निंबाळकर,शिवराज स्वामी, शिवशरण जोजन, अतुल जाधव, विजयकुमार कडगंची, शंकर व्हनमाने, शिवशंकर स्वामी, माणिक बिराजदार आदींनी मनोगत व्यक्त करून स्व. अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून दिली.
या सभेस अमर शिंदे, सुभाष गडसिंग, राचप्पा वागदरे, स्वप्निल शहा, अरुण भुजंगे, संगम बडवे, सुधाकर गोंडाळ, बसवराज बाणेगाव, महादेव वाले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.