आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असले तरी, गेल्या काही वर्षांत लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. यामुळे आहारात नैसर्गिक आणि पोषक घटकांचा समावेश वाढत आहे. यामध्येच आवळा म्हणजेच गूजबेरीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आयुर्वेदात ‘अमृतफळ’ म्हणून ओळखला जाणारा आवळा हा आरोग्यासाठी सुपरफूड मानला जातो. मात्र, त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापर केल्यासच खरे फायदे मिळतात, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.
आहारतज्ज्ञ रंजनी रमण यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आवळ्याच्या सेवनाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असल्याने तो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. सर्दी, खोकला, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण देण्यास मदत करतो. तसेच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवून मधुमेहींसाठी उपयुक्त ठरतो. आवळ्यामुळे रक्त शुद्धीकरण होते, त्वचेवर नैसर्गिक तेज येते आणि पिंपल्ससारख्या समस्या कमी होतात.
पचनसंस्थेसाठी आवळा अत्यंत फायदेशीर असून बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीच्या तक्रारी कमी करतो. केस गळणे थांबवणे, अकाली पांढरे केस रोखणे आणि दृष्टी सुधारण्यास मदत करणे हेही त्याचे महत्त्वाचे फायदे आहेत. हृदयविकाराचा धोका कमी करणे आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही आवळ्याचा उपयोग होतो.
मात्र, तज्ज्ञांचा इशारा आहे की, अधिक फायदे मिळावेत म्हणून आवळ्याचे अति सेवन करू नये. दररोज अर्धा किंवा लहान ताजा आवळा पुरेसा असून, आवळा पावडर घेतल्यास अर्धा चमचा योग्य आहे. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटात जळजळ, गॅस किंवा पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने काही जणांना आंबटपणा किंवा अतिसार होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून ३ ते ४ वेळा, जेवणानंतर किंवा जेवणासोबत आवळ्याचे सेवन करणे अधिक सुरक्षित मानले जाते.
ताजे आवळे, चटणी, भाजी, पावडर किंवा हलका रस अशा विविध स्वरूपात आवळा आहारात समाविष्ट करता येतो. मात्र रस फार जाड किंवा थंड नसावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि योग्य पद्धत पाळल्यास आवळा आरोग्यासाठी खरोखरच अमृत ठरतो.