पुणे वृत्तसंस्था
पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे मृतावस्थेत सापडले आहेत. सतीश वाघ यांचं आज पहाटे अज्ञात आरोपींकडून अपहरण करण्यात आलं होतं. चारचाकी गाडीवरुन आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्ती गाडीत टाकत त्यांचं अपहरण केलं होतं. संबंधित घटना ही पुण्यातील एका चौकात झाली होती. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली होती. या घटनेचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला होता. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.
याप्रकरणी पोलिसांकडून सतीश वाघ आणि आरोपींचा शोध सुरु होता. योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे पुण्यात एका ठिकाणी मृतावस्थेत सापडले आहेत. त्यांचं अपहरण करणाऱ्या आरोपींनीच त्यांची हत्या केल्याची शक्यता आहे. सतीश वाघ यांचा यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे पुण्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.
सतीश वाघ यांच्या अपहरणाची घटना ही आज सकाळच्या सुमारास घडली होती. सतीश वाघ हे सोलापूर रस्त्यावर असलेल्या ब्ल्यू बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. यावेळी अचानक शेवरलेट एन्जॉय ही गाडी आली. या गाडीतून दोन अज्ञात आरोपी बाहेर आले. त्यांनी आधी सतीश वाघ यांच्याशी बातचित करण्याचं नाटक केलं. त्यांनी सतीश वाघ यांना काहीतरी विचारपूस करण्याचं नाटक केल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांनी बळजबरी सतीश वाघ यांना गाडीत बसवलं. यानंतर ते सतीश वाघ यांना अज्ञातस्थळी घेऊन गेले. आता अचानक सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे त्यांच्या अपहरण आणि हत्येमागचं गूढ वाढलं आहे.
सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांकडूनही शोध सुरु झाला होता. या दरम्यान सतीश वाघ यांच्या अपहरण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत होते. पण त्यांचा तपास सुरु असतानाच आता सतीश वाघ मृतावस्थेत सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.