मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी आक्रमक झाले आहेत. मराठा समाज माझ्या पाठीमागे असून हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाका, ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असं ओपन चॅलेंज जरांगेंनी सरकारला दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी ८ दिवस उपोषण करून बघावं, पोट आपोआप कमी होईल, असा टोलाही जरांगेंनी लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (ता. १३) बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईत मराठा समाजाची संवाद बैठक घेतली. या बैठकीतून त्यांनी राज्य सरकारला चांगलंच सुनावलं. राजकीय पुढाऱ्यांनी मराठा बांधवांच्या दारात येऊ नये, अन्यथा तुम्हाला रोषाचा सामना करावा लागेल, असा इशाराही जरांगेंनी दिला. पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचे नाही, अशा पोस्टरचे जरांगेंनी यावेळी प्रदर्शन केले. त्याचबरोबर जरांगेंनी फडणवीसांवर तोंडसुख देखील घेतलं. तुम्हाला तुमची आई बहीण दिसली, पण आमची अंतरवली येथे आमच्या आई-बहिणींना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तेव्हा तुम्ही कुठे होता? असा सवालही जरांगेंनी विचारला. “छत्रपती शिवाजी महाराज काय होते, हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेश जारी केला जात नाही. तोवर मी तुम्हाला सोडणार नाही. मला जेलमध्ये टाकण्यासाठी हिम्मत लागते. माझ्या पाठीमागे संपूर्ण समाज आहे”, असं आव्हान देखील जरांगेंनी फडणवीसांना दिलं.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, “तुम्ही ४ वेळा समाजाला फसवलं मागच्या ६ महिन्यापासून आम्ही आपल्याला विनवण्या करत आहोत अन् तुम्ही आमचे ऐकत नाहीत म्हणल्यावर आम्ही थोड बोलणारच. मग आपल्याला राग नाही आला पाहिजे. मला राजकारण्यांचे देणे घेणे नसून फक्त आरक्षण हवंय. फडणवीस साहेब तुमच्यासोबत आमचं शत्रूत्व नाही”, असंही जरांगे पाटील म्हणाले.