छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवर मोठा वाद सुरु झाला होता तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडी पाडव्याच्या भाषणात औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले होते. यावेळी बोलताना औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिसली पाहिजे. तिथे एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब आम्ही इथे गाडला गेला. हा आमचा इतिहास. आम्ही कोणाला गाडले हे जगाला कळू द्या, असे राज ठाकरे म्हटले होते. तसेच तिकडे लहान मुलांच्या सहली गेल्या पाहिजेत असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.
राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगरचे मनसे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून यात पाच प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. औरंगजेबाच्या कबरीजवळ जर सजावट असेल तरी ती त्वरीत काढली जावी, यापुढे कुठलाही सरकारी खर्च येथे करायचा नाही, सर्व शाळांतील मुलांच्या शैक्षणिक सहली तिथे काढण्याचा आदेश काढण्यात यावा, तिथे एक बोर्ड लावण्यात यावा “आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला”, असे लिहिलेला तसेच या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आमच्या संभाजी महाराजांना अमानुषपणे, क्रूरपणे मारणाऱ्या औरंगजेबची कबर आहे, छत्रपती शिवाजी महारांजानी दिलेला विचार औरंगजेब नष्ट तर करू शकलाच नाही पंरतु तो स्वताः इथे पवित्र भूमीत गाडला गेला, जो आमच्या धर्मावर उलटला होता, आमची मंदिरे पाडत होता, आमच्या आया-बहिणीची अब्रू लुटत होता, तो इथेच संपला हा इतिहास आहे.
अशा परिस्थितीत त्याच्या कबरीजवळ जर सजावट असेल तर ती सजावट त्वरीत काढूण टाकण्यात यावी. ती नुसती कबर दिसली पाहिजे, तिथे यापुढे कुठलाही सरकारी खर्च होता कामा नये. जसे की, रंगरंगोटी, दुरुस्ती, बांधकाम काहीच नको. इथे एक बोर्ड लावण्यात यावा “आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला” त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या शैक्षणिक सहली तेथे आयोजित करण्यात याव्यात, जेणेकरून आमच्या पुढील पिढीला आणि जगाला हे कळले पाहिजे की आम्ही कुणाला गाडले आहे, त्याच प्रमाणे येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, जेणेकरून जो कोणी त्या कबरीवर फुल चादर चढवण्यास येईल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आमच्या मागणीचा विचार करून यावर तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कारणयात आली आहे.