सांगोला : वृत्तसंस्था
सांगोला मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणातून दोन गटांत चाकू, काठी, लाकडी फळी व धारदार शस्त्राने झालेल्या जबर हाणामारीत दोघांचा खून झाला, तर पाच जण जखमी झाले. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सांगोला तालुक्यातील कोळा येथे ही घटना घडली.
याबाबत परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेने कोळासह सांगोला तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन्ही गटांतील चौघांना ताब्यात घेतले आहे. बाळू शामराव आलदर (वय ३०, रा. संत तुकाराम नगर, आलदर वस्ती, कोळा ता. सांगोला) व सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे(वय ३१ रा. आंबेडकर नगर, कोळा) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश मोरे व सुजीत काटे यांनी कट मारल्यावरून कुंडलिक आलदर व बिरू खरात यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर वाद मिटवण्यात आला पण दुसऱ्या दिवशी वाद वाढून दोन्ही गटांत हाणामारी होऊन दोघांचा खून झाला.
कुंडलिक आलदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सूरज उर्फ बंड्या रमेश मोरे, विनय उर्फ छोट्या विकास मोरे, जयराम काटे, शिवा उर्फ सुजित काटे, विकास मोरे, अभिमान मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी कुंडलिक आलदर, बाळू आलदर, दत्ता आलदार हे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गावातील खंडोबा मंदिराजवळ थांबले असता वरील सहा जणांनी मागील भांडणाचा राग मनात धरून चाकू, काठी व इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात गंभीर जखमी होऊन बाळू आलदर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.