मुंबई : वृत्तसंस्था
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी गुरुवारी मुंबईच्या धावत्या दौऱ्यावर आले. त्यांनी या दौऱ्यात मुंबई मनपा निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती तयार केली. धारावी या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत जाऊन त्यांनी तेथील कामगार वर्ग विशेषत: दलित आणि ओबीसी समाजातील लोकांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस या वर्गावर अधिक भर देणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, मुंबईत येऊनही राहुल यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणे टाळले. यातून त्यांनी मुंबई मनपा स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचे म्हटले जात आहे.
धारावीतील ‘चामर स्टुडिओ’ला भेट देऊन राहुल यांनी मुंबई काँग्रेसची पुढील राजकीय रणनीती काय असणार आहे हे स्पष्ट केले आहे. धारावीत लहान-मोठी कामे करणाऱ्या कामगारांचे पुनर्वसन याच परिसरातच व्हावे अशी काँग्रेसची मागणी आहे. पुनर्वसनाचे कंत्राट अदानी समूहाला ज्या पद्धतीने देण्यात आले त्याचाही काँग्रेस विरोध करत आहे. शरद पवार अदानींचे समर्थन करतात. तर दिल्ली विधानसभेनंतर उद्धव ठाकरे आणि राहुल यांच्यात दुरावा वाढला आहे. म्हणूनच त्यांनी पवार, ठाकरेंना भेटणे टाळले. विशेष म्हणजे, राहुल गुरुवारी रात्री ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यापासून काही अंतरावर असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये थांबले होते.
राहुल गांधी बहुचर्चित चामर स्टुडिओत शिलाई मशीनवर बसले. त्यांनी सुईत धागा ओवून पाहिला. लोकांशी बोलताना ते म्हणाले की, ही धारावी तुमची आहे. तुमचीच राहिली पाहिजे. तुमच्याकडे कौशल्य आहे. तुम्हाला केवळ थोडेसे साहाय्य हवे आहे. तुमच्यासाठी बँकांचे दरवाजे उघडले गेले पाहिजेत. धारावी हेच खरं मेक इन इंडिया आहे. दलाल नव्हे तर तुम्हीच राष्ट्र घडवता, असेही त्यांनी सांगितले.