प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला राहुल गांधींचे बळ, काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले होते. पण, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे, त्यामुळे स्वबळावर लढाईसाठी मंजुरी दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माहाराष्ट्र राज्य कॉंग्रेस प्रभारी एच.के. पाटील, के.सी वेणुगोपाल या नेत्यांनी १२ तुघलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी जाऊन दुपारी भेट घेतली. यावेळी तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीत महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
खासदार राहुल गांधी यांच्या भेटी नंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. राहुल यांच्या भेटीनंतर नानांनी थेट स्वबळाची भाषा केल्याने काँग्रेस निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्यासोबत राहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असे नाना पटोले म्हणाले.