नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रेल्वेने आजपासून प्रवासी भाड्यात वाढ लागू केली असून, त्यामुळे लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागला आहे. नव्या निर्णयानुसार प्रति किलोमीटर २ पैसे दराने भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ २१५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी लागू असणार आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाढीव भाडे मोजावे लागणार आहे.
नव्या दररचनेनुसार, जर एखाद्या प्रवाशाने १००० किलोमीटर अंतरासाठी तिकीट बुक केले, तर त्याला सुमारे २० रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागेल. मात्र, २६ डिसेंबरपूर्वी तिकीट बुक केलेल्या प्रवाशांवर या भाडेवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. अशा तिकिटांवर सुधारित भाडे आकारले जाणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
आज किंवा आजनंतर TTE कडून ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर तिकीट काढल्यास वाढीव भाडे आकारले जाईल. मात्र, २१५ किलोमीटरपेक्षा कमी अंतराचा प्रवास करणारे प्रवासी तसेच मासिक सीझन तिकीट (MST) धारकांसाठी भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे अल्प अंतराच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या अंदाजानुसार, या भाडेवाढीमुळे रेल्वेला वार्षिक सुमारे ६०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. ही भाडेवाढ २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती.
याशिवाय, उपनगरीय (सब-अर्बन) रेल्वे सेवा, लोकल गाड्या आणि मासिक पासच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्ये लोकल ट्रेनने रोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, ही भाडेवाढ वाढत्या परिचालन खर्च, पायाभूत सुविधा विकास, नवीन गाड्यांचे संचालन आणि स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उभारण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नाचा वापर रेल्वे सेवांच्या सुधारणा आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी करण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.