ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माढा, पंढरपूर, करमाळ्यात ढगफुटीसदृश पाऊस, हातातोंडाशी आलेल्या पिकांना फटका

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढा आणि करमाळा तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. माढा तालुक्यातील बेंद ओढय़ाला पूर आला असून, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर, ठिकठिकाणी हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. उसासह फळबागांनाही या पावसाचा फटका बसला आहे.

माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे 90 मिमी, रांजणी 81 मिमी, रोपळे 126 मिमी, निमगाव टें. 83 मिमी, तर मोडनिंब येथे 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मंडळातील अनेक गावांतील शेती आणि पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. बादलेवाडी, ढवळे, दहिवली, कंदर, शेडशिंगे, जाखले, उपळवटे, चोभेपिंपरी, भोगेवाडी, रोपळे, कन्हेरगाव, नाडी, लोणी, मुंगशी, सापटणे टें., निमगाव टें., पिंपळनेर या गावातील केळी, पेरू, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. तर नव्याने लागण झालेल्या उसात पाणी साचल्याने तेथे दुबार लागवडीचे संकट ओढवले आहे.

माढा-कुर्डूवाडी रस्त्यावर भोसरे गावच्या हद्दीतून बेंद ओढय़ाला आलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली. या ओढय़ावरील पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. त्यातच पर्यायी रस्तादेखील वाहून गेल्याने ही वाहतूक बंद पडली. त्यामुळे सकाळी वैराग, सोलापूर येथून कुर्डूवाडीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आली. पावसाचे पाणी कुर्डूवाडी आगारात शिरल्याने एसटी बसेस जागेवरच अडकून राहिल्या होत्या. त्यामुळे तालुकांतर्गत एसटी वाहतूक ठप्प झाली होती. जाखले आणि चोभेपिंपरी गावच्या शीवहद्दीवर असलेला पाझर तलाव फुटल्याने त्याखाली असलेल्या चोभेपिंपरी गावाच्या हद्दीतील अनेक विहिरी गाळाने बुजल्या आहेत.

कुर्डूवाडीतील टेंभुर्णी रोड परिसरातील ओढय़ालगत असणाऱया वस्त्यांमधील प्रत्येक घरात कमरेएवढे पाणी शिरले होते. अथर्व हॉटेल, जिव्हाळा शाळा व परिसर पूर्णपणे पाण्याने वेढला गेला होता. त्यामुळे टेंभुर्णीकडून कुर्डूवाडी शहरात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. तर, कुर्डू शिवारातील गोरे वस्तीनजीकच्या रेल्वे पुलाला केवळ दीड फूट पाणी टेकायचे बाकी होते. पंढरपूर रोडवरील बसस्थानकानजीकच्या डॉ. कुंतल शहानगर, एसटी आगार, आगारप्रमुखाचे निवासस्थान, तर गोरेवस्ती येथीलही घराघरांत सुमारे तीन ते चार फूट पाणी शिरले होते.

 

केम परिसराला झोडपले

केम येथे रात्री दोनच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल वीस वर्षांनंतर असा पाऊस झाल्याची जाणकारांनी माहिती दिली. पानटपरी, दुकानदार व शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. करमाळा व कुर्डूवाडीतील जाणारे रस्ते या ढगफुटीसदृश पावसामुळे बंद झाले होते.

करमाळा तालुक्यातील केम येथे रात्री दोनच्या सुमारास ढगफुटीसदृश पावसाचा तडाखा बसला आहे. या पावसामुळे गावात सर्वत्र पाणी साचले होते. या पावसामुळे रस्त्यावर जवळपास दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. अनेक टपऱया व दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने साहित्य व अन्नधान्य, स्टेशनरी वस्तूंचे नुकसान झाले आहे. याशिवाय आजूबाजूच्या शेतातही उभ्या पिकामध्ये दोन ते तीन फूट पाणी साचल्याचे दृश्य सर्वत्र होते. कुर्डूवाडी रोडवरील रेल्वेपुलाखाली पाणी साचल्याने करमाळा-कुर्डूवाडीला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. वीस वर्षांतील सर्वाधिक हा मोठा पाऊस असून, यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

 

पंढरपूर तालुक्यात ओढे-नाले पुन्हा वाहू लागले

शहर व तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून दमदार पाऊस झाला आहे. शेतीतील ताली भरल्या असून, विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ओढय़ाकाठच्या विहिरींनादेखील पाझर लागले आहेत. या सततच्या पावसामुळे ओढे, नाल्यांना पाणी वाहू लागले आहे. असे असले तरी दमदार पाऊस झाल्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नसल्याने शेतकऱयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

पंढरपूरच्या पूर्व-पश्चिम भागात सलग तीन दिवस पाऊस सुरू आहे. पळशी, उपरी, भंडीशेगाव या मार्गे असणारा कासाळगंगा ओढा वाहू लागला आहे. तर, उंबरगाव, बोहाळी, कोर्टी, गादेगाव, इसबावी मार्गे भीमा नदीला मिळणारा ओढादेखील भरून वाहू लागला आहे. कासेगाव भागातील ओढादेखील वाहत असून, गोपाळपूर येथे भीमा नदीला मिळत आहे. पावसामुळे भाजीपाला व्यापाऱयांची व ग्राहकांची तारांबळ उडाली.

शेती पिकात विशेषतः उसात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे उसाची वाढ खुंटत आहे. सलग तीन ते चार दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे फळपिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती शेतकऱयांमधून व्यक्त केली जात आहे. डाळिंबावर तेल्या, मर, कुजवा, पीन होल बोरर आदींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर ऍप्पल बोर व देशी बोर बागांवरदेखील बुरशी, भुरी, कुजवा आदी रोगांचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!