मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पाऊस पुन्हा सुरु झाला असून नुकतेच हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हवामान विभागाने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या भागात देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तर राजस्थानमध्ये देखील 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विदर्भात देखील सात सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुढील तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या दक्षिण बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र असून येथील प्रणाली वायव्यकडे सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ या भागात देखील काल जोरदार पावसाने हजेरी लावली. त्याशिवाय वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही पावसाचा अलर्ट देण्यात आला होता. ही पावसाची स्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन देखील हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.