मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसात शिवसेनेच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईचा निकाल बाहेर येणार आहे. त्यापूर्वी अनेक राजकीय भेटींना उधान आले आहे. नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी भेट घेतली गत काही महिन्यांतील या दोन्ही नेत्यांची ही 6 वी भेट आहे. या भेटीचाही तपशील नेहमीप्रमाणे गुलदस्त्यात ठेवण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना मोठे उधाण आले आहे.
राज ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर ही उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांत जवळपास अर्धा तास बंद दरवाज्याआड चर्चा झाली. त्यामुळे त्यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्यावर चर्चा झाली हे कळू शकले नाही. पण ही चर्चा मराठी पाट्या व टोलनाक्यांच्या मुद्याभोवती फिरती असावी असे मानले जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेने मराठी पाट्या व टोलनाक्यांवरील अवैध वसुलीचा मुद्दा उचलून धरला आहे. मराठी पाट्याविषयी व्यापाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावल्यामुळे मनसेने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यात याव्यात, तसेच कोर्टाच्या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचा पाठपुरावा या बैठकीत घेण्यात आल्याची शक्यता आहे.