मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नसल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत पराभवाला आपण देखील तेवढेच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर मनसे बैठकीत अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तंबी देखील दिली आहे. आगामी पंधरा दिवसात महानगरपालिका निवडणूक आली आहे असे समजा आणि कामाला लागा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.
पक्षाच्या पराभवाला ईव्हीएमला दोष देणार नाही. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी आपण स्वतः देखील जबाबदार असल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच ईव्हीएमला दोष द्यायचा असेल तर ईव्हीएम हॅक होऊ शकत हे सिद्ध करून दाखवा, अशा शब्दात अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर आपले मत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक राज ठाकरे यांनी बोलावली होती. आगामी काळातील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानले जात आहे. या निमित्ताने विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची समीक्षा देखील पक्षाच्या वतीने केली जात आहे. याच बैठकीमध्ये अमित ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगामी पंधरा दिवसात मनपा निवडणूक आहेत असे समजून कामाला लागा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. इतकेच नाही तर काम होत नसेल तर पद सोडा, अशा प्रकारचा इशारा देखील पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सर्वच विरोधी राजकीय पक्षांनी ईव्हीएम वर बोट ठेवले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप वारंवार केला आहे. यात राज ठाकरे यांचा देखील समावेश आहे. राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएममधील निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र अमित ठाकरे यांनी ईव्हीएमला दोष देत बसू नका, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचा आणि आगामी पंधरा दिवसात महानगरपालिका निवडणूक आहे अशा पद्धतीने कामाला लागा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.