मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लूट करणारे आणि पेंढारी असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या कामांत मोजणी करताना बाळाचा वापर होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावरील पोस्ट माध्यमातून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुसरा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून शक्तिपीठ महामार्गाकडे पाहिले जाते. याआधी समृद्धी महामार्गाला देखील मोठ्या प्रमाणात राज्यातून विरोध झाला होता. मात्र तरी देखील समृद्धी महामार्ग आता पूर्ण झाला आहे. त्याचप्रमाणे आता शक्तिपीठ महामार्गाला देखील विरोध होत आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या महा-मार्गासाठी जमीन मोजणी करताना बाळाचा वापर होत असल्याचा आरोप केला आहे.
सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टाहास का व कशासाठी करत आहे. कारण या शक्तिपीठ महामार्गातून जवळपास 50 हजार कोटीचा ढपला पाडला जाणार असल्यानेच हा प्रकल्प जनतेच्या माथी लादला जात असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजे शक्तिपीठ महामार्गातून राज्यातील शेतकरी व जनतेचे लूट करणारे सध्याच्या युगातील ठग आणि पेंढारी झाले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील वानेवाडी येथे शक्तिपीठ महामार्ग मोजणीसाठी आले असता शेतक-यांनी या मोजणीस कडाडून विरोध केला. राज्य सरकार पोलिसांना हाताशी धरून बळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी करत आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे शेतकरी व जनतेचे लूट करणारे सध्याच्या युगातील ठग आणि पेंढारी झाले आहेत. सध्या रत्नागिरी -नागपूर हा रस्ता अस्तित्वात असून या मार्गावर तुरळक वाहतूक आहे. सध्या रोज या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास किमान ४० लाख टोल संकलित होण्याची आवश्यकता असताना सध्या दररोज ११ ते १२ लाख रूपये इतकाच टोल गोळा होत आहे. गेल्या दिड वर्षापासून हा महामार्ग तोट्यात जात असून याचा भुर्दंड सामान्य करदात्या जनतेवर बसणार आहे.