अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शहरातील मंगरूळे बायपास चौक ते ए- वन चौक रस्त्याचे काम गतीने सुरू असून या रस्ते कामात अडथळा ठरणारे श्री राम मंदिराच्या उत्तर बाजूचे वॉल कंपाऊंड पाडण्यात आले आहे. तात्काळ पुन्हा रस्त्याला जाणारी जागा सोडून नवीन बांधकामाला देखील प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. यासाठी देवस्थाने सहकार्याची भूमिका घेतली.या रस्त्यामध्ये येणारे सर्व अडथळे नगरपरिषदेकडून हटविण्यात येत आहेत.वॉल कंपाऊंड काही अंशी रस्त्यामध्ये येत होते.ही बाब नगर परिषदेने वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या निदर्शनास आणून दिली होती.तत्पूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि महेश इंगळे यांच्यात सकारात्मक चर्चा होऊन वॉल कंपाऊंड पाडण्यास देवस्थानने संमती दिली होती. त्यानुसार वॉल कंपाऊंड पाडण्यात आले असून पुन्हा तातडीने ते नवीन बांधून घेण्यात येत आहे. रस्त्यातील अडथळा ठरणारे मंदिराचे वॉल कंपाऊंड पाडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु विकासाच्या कामांमध्ये आमची सहकार्याची भूमिका आहे यापुढे देखील ती राहील,असे इंगळे यांनी चर्चे दरम्यान स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात वॉल कंपाऊंडच्या ठिकाणी जाऊन जागेची पाहणी देखील केली होती. त्यावेळी देवस्थानच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. अक्कलकोट शहरात महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. ज्या ज्या ठिकाणी असे काही प्रसंग येत आहेत.त्या त्या ठिकाणी नागरिकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी. असे कामे पुन्हा होत नाहीत जितके शक्य आहे तितके सहकार्य विकासासाठी करावे, अशी अपेक्षा आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली. या रस्त्यात जितके काही अतिक्रमणे आहेत. ते अतिक्रमणे बाजूला करून हा रस्ता चांगल्या पद्धतीने करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले.
यावेळी वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, मिलन कल्याणशेट्टी, प्रदीप पाटील महेश हिंडोळे,यशवंत धोंगडे आदी उपस्थित होते.