सोलापूर : वृत्तसंस्था
मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण तितकाच भाग्यवान देखील आहे. एका रिंगमध्ये फडणवीससाहेब माझा फोन उचलतात. हे शक्य केवळ आपण भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानेच झालं, असा दावा भाजपाचे माजी आमदार राम सातपुते यांनी केला आहे. तसेच माढा लोकसभा मतदार संघाची अवस्था पावसात हल्या धुतल्यासारखी झालीये, असं म्हणत राम सातपुते यांनी हल्लाबोल केला आहे. माळशिरसचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. आप्पासाहेब देशमुख यांनी जयकुमार गोरे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन माळशिरसमध्ये केलं होतं, त्यावेळी राम सातपुते यांनी पुन्हा एकदा धैर्यशील मोहिते पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे.
राम सातपुते म्हणाले, मी कार्यकर्ता आहे.एका रिंगवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात. इतकं भाग्य मला भेटलं आहे. कारण मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. आता कोणतीही निवडणूक लागू द्या. मैदानात या. तुम्हाला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढचं या ठिकाणी सांगतो, असं म्हणत राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
पुढे बोलताना म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार पराभूत होऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील निवडून आले. मात्र माढा मतदार संघाची अवस्था पावसात धुवून निघालेल्या हल्या सारखी झाली आहे. पण आम्ही रगेल कार्यकर्ते या मतदारसंघात परिवर्तन घडवून आणू. असे सांगत थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर सडकून टीका राम सातपुते यांनी केली.
मोहिते पाटील सध्या करमाळा तालुक्यात लागलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जाऊन प्रचार करतात आणि सहकार वाचवण्याचे तत्वज्ञान सांगतात. पण, मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यातील सूतगिरणी, कुक्कुटपालन अशा संस्था खानदानी समजून विकून खाल्ल्या. मात्र या शेतकऱ्याच्या संस्था होत्या. कारखान्यामध्ये शेतकऱ्यांनी शेअर घेतले. मात्र हे लुटून खायचे काम यांनी केलं, अशी टीका राम सातपुते यांनी केली.