ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मंत्रीपदाच्या प्रश्नावर राणेंनी केला खुलासा

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार व माजी मंत्री नारायण राणे यांचा विजय झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गाच्या विकासावर भर देणार असल्याचं स्पष्ट केलं. सिंधुदुर्गात नोकरीचा प्रश्न आहे. मी त्यावर काम करत आहे. जिल्ह्यात उद्योगधंदे आण्याचा प्रयत्न आहे. दोन वर्षात जिल्ह्यात उद्योगधंदे येतील. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. या ठिकाणी पर्यटकांना पोषक वातावरण करणार आहे. हॉटेल व्यवसाय वाढावा, आलेल्या पर्यटकांना इथे आनंदाने दिवस घालवण्यासाठी मनोरंजनाची साधनं निर्माण करण्यावर माझा भर असणार आहे. शिवाय स्थानिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असं नारायण राणे म्हणाले.

आम्हीच मोठे भाऊ असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यावर त्यांना विचारण्यात आलं असता राणे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. संजय शिरसाट कोण आहेत? आमदार आहेत. अच्छा… अच्छा. कोण वैयक्तिक काय बोललं त्याला काही अर्थ नसतो. महायुती असल्याने सर्वांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. इथे कोणी तराजू घेऊन बसलं नाही, मोठं कोण आणि लहान कोण करायला. मोठं कोण आहे? ते कशावर ठरवावं हे आधी ठरवा, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.
राज्यात आमचीच सत्ता येणार असा दावा महाविकास आघाडीने केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही राज्यात आहोत आणि राहणार. जसं केंद्रात तिसऱ्यांदा आले आणि पंतप्रधान झाले. तसंच महाराष्ट्रात होणार. त्यामुळे दावा करून काही फरक पडत नाही. कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. कोण आडवे आले. त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ. सर्व आडवे झाले आहेत. आम्ही कोकणात कुणाला शिरू देणार नाही, असंही ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!