मुंबई वृत्तसंस्था
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला असून मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.
“माझ्या 44 वर्षांच्या काँग्रेस पक्षाच्या सेवेचा आदर केला जात नसल्यावर माझा विश्वास बसला आहे. यामुळे मी सर्व पदांचा, पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे,” असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात राजा यांनी म्हटले आहे.
रवी राजा हे सायन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सकाळीच ते भाजप प्रदेश कार्यालयात दाखल झाले आणि नुकताच त्यांचा देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थिती जाहीररित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला आहे. त्यानंतर रवी राजा यांची मुंबई भाजप उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या कॅप्टन तमिळसेल्वनकडून १४ हजार मतांच्या फरकाने पराभूत होऊनही गणेश यादव यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. रवी राजा सायन-कोळीवाड्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पक्षाचा विशेषत: तमिळ आणि मराठी मतदारांमध्ये असलेला पाठिंबा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र रवी राजा यांच्या निर्णयाने मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.