ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आरबीआयचा ऐतिहासिक निर्णय : दहा वर्षांच्या मुलांनाही मिळणार स्वतःचे बँक खाते !

मुंबई : वृत्तसंस्था

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक ऐतिहासिक निर्णय घेत, आता १० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना स्वतःचे बँक खाते उघडण्याची आणि ते स्वतः ऑपरेट करण्याची मुभा दिली आहे. हा निर्णय मुलांमध्ये आर्थिक शिस्त, स्वावलंबन आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

यापूर्वी अल्पवयीन मुलांचे बचत खाते पालकांच्या नावावर उघडले जाई आणि त्याचद्वारे ते चालवले जात होते. मात्र आता, RBI च्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार, १० वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना बचत खाते (Saving Account) तसेच टर्म डिपॉझिट अकाउंट उघडण्याची आणि वापरण्याची संधी दिली जाईल. या निर्णयाची अंमलबजावणी बँकेच्या रिस्क मॅनेजमेंट पॉलिसीनुसार केली जाईल. कोणत्या अटी व शर्ती लागू करायच्या, कोणत्या सुविधा द्यायच्या (जसे की इंटरनेट बँकिंग, एटीएम, डेबिट कार्ड, चेकबुक) याचा निर्णय संबंधित बँक घेणार आहे.

अशा अल्पवयीन खातेदारांची पूर्व तपासणी करणे, खात्याच्या व्यवहारांवर लक्ष ठेवणे, आणि खात्यातून बिनधास्त पैसे काढले जाणार नाहीत याची खात्री करणे – या जबाबदाऱ्या बँकांवर सोपवण्यात आल्या आहेत. जेव्हा खातेदार १८ वर्षांचा होईल, तेव्हा त्याला नवीन सहीसह खाते नोंदणी करणे आणि बँकेच्या अपडेटेड अटी स्वीकारणे अनिवार्य असेल.

RBI ने बँकांना १ एप्रिल २०२५ पर्यंत त्यांच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निर्णयाचे परिणाम टप्प्याटप्प्याने देशभरात दिसू लागतील. १० वर्षांखालील मुलांसाठीही खाते उघडण्याची परवानगी आहे, परंतु त्याचे संपूर्ण ऑपरेशन पालक किंवा अधिकृत संरक्षकच करतील. हा निर्णय बालवयातच आर्थिक शिक्षणाची बीजे पेरण्याच्या दृष्टिकोनातून स्वागतार्ह असून, डिजिटल युगात लहान मुलांना जबाबदार आर्थिक सवयी लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!