ध्यास विश्वसार्ह बातमीचा

येत्या २४ तासासाठी अनेक अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट

मुंबई : वृत्तसंस्था

पुढील 24 तासासाठी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळवले आहे.

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्रामार्फत ठाणे, मुंबई शहर व उपनगर, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला दि. 24 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5.30 पासून ते दि. 26 जुलै 2025 रोजीचे रात्रौ 8.30 पर्यंत 3.8 ते 4.7 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच समुद्रातील उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशारा देण्यात आला असून सर्व जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील गोमणी येथे कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात ग्रामसेवक उमेश धोडरे अडकले असता, पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहचून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगर यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातून अनुक्रमे 2043.74, 2118.95 आणि 3315.25 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळवण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभागाने 24 आणि 25 जुलै 2025 या दोन दिवसांसाठी मराठवाडा विभागात मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास जोरदार सरी पडू शकतात. काही भागांत विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा वेग वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. नद्या-नाल्यांमध्ये पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठी किंवा पुराच्या संभाव्य भागात असणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे. हवामानातील या बदलामुळे तापमानात घसरण होणार असून, काही भागांमध्ये पावसामुळे दळणवळणास अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!