बीड वृत्तसंस्था : जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रीलस्टार दाम्पत्याच्या आयुष्याला क्षणात काळाने गालबोट लावले आहे. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच ऊसाच्या ट्रॉलीखाली दबून गणेश डोंगरे यांचा मृत्यू झाला. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्याने संपूर्ण परिसरासह सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीडच्या वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हे दोघेही ऊसतोड कामगार होते. मेहनती मजुरीसोबतच गावचं निसर्ग सौंदर्य, अस्सल गावराणी भाषा आणि साधं आयुष्य रिल्सच्या माध्यमातून मांडत त्यांनी सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. मात्र सोमवारचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस ठरला.
गणेश आणि अश्विनी हे लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी गेले होते. कारखान्याच्या वजन काट्याजवळ ऊस मोजणीसाठी मोठी गर्दी होती. नंबर येण्यास उशीर होत असल्याने अश्विनीने फेसबुक लाईव्ह सुरू करून कारखान्यातील परिस्थिती, उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉल्या, चालकांची गडबड आणि मजूर कसे तिथेच जेवण करत आहेत, याची माहिती देण्यास सुरुवात केली.
नवऱ्यापासून केवळ एका मिनिटासाठी बाजूला गेलेल्या अश्विनीच्या आयुष्यावर अचानक आघात झाला. गणेश जिथे बसला होता, तिथे अचानक ऊसाने भरलेली ट्रॉली कोसळली आणि त्यात गणेश दबला गेला. हे दृश्य पाहताच अश्विनी किंचाळली. अवघ्या एका मिनिटाच्या अंतरामुळे तिचा जीव वाचला, मात्र तिच्या आयुष्याचा साथीदार कायमचा निघून गेला.
घटनेनंतर उपस्थित मजुरांनी तातडीने गणेशला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला असून डोंगरे कुटुंबावर आणि डोंगरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.
या घटनेनंतर ऊसतोड कामगारांमध्ये तीव्र संतापाची भावना असून, साखर कारखान्याने गणेश डोंगरे यांच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. यासाठी कामगारांनी आंदोलनही सुरू केले आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रीलस्टारचा अशा दुर्दैवी पद्धतीने मृत्यू झाल्याने त्यांच्या चाहत्यांकडूनही तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला जात आहे.