ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परदेशी नागरिकांचा धार्मिक छळ ; केंद्र सरकारवर राऊतांची टीका

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी लोकसभा निवडणुक जाहीर झाली असतांना आता सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाली असतांना नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

खा.राऊत म्हणाले कि, परदेशी नागरिकांचा धार्मिक छळ होणार असेल तर त्यांच्यासाठी भारताचे दरवाजे खुले करणारा ‘सीएए’ कायदा आता संमत झाला आहे. पण भारतातील नागरिकांना रोज त्यांच्या हक्कांसाठी लढावे लागत आहे. वंचित, दलितांना आजही जातीय भेदाभेदीस सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी सार्वजनिक पाणवठे बंद आहेत. सवर्ण त्यांना चपला घालू देत नाहीत. हे काय समतेचे राज्य आहे? कायद्याचे राज्य तर नाहीच! अशी टीका त्यांनी केली आहे.

”परदेशातून येणाऱ्या हिंदूंची काळजी मोदी सरकारला वाटते. पण कश्मीर खोऱ्यातील हजारो ‘पंडित’ आजही जम्मूतील छावण्यांत निर्वासितांचे जिणे जगत आहेत. धार्मिक कारणांमुळेच त्यांचा छळ आपल्याच देशात सुरू आहे. त्या सर्व भारतीयांचे नागरिकत्व अबाधित असले तरी आपल्याच भूमीत त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मोदी देऊ शकले नाहीत. मणिपुरात जात आणि वर्गकलहात गेल्या वर्षभरात शेकडो भारतीय नागरिक मरण पावले. त्यांच्या हत्याच झाल्या. त्यांना आपल्याच देशात धड जगता येत नाही. परदेशी नागरिकांना भारतात आश्रय देण्याचा कायदा करणारे भारतातील अशा अन्यायग्रस्तांकडे मानवतेच्या दृष्टीनेही पाहायला तयार नाहीत”, असे राऊतांनी म्हंटले आहे.

तसेच ”नागरिकत्व सुधारणा कायदा मोदी सरकारने आणला आहे. बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात धार्मिक कारणामुळे छळ झाल्यामुळे भारतात आलेल्यांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल, असे राज्य घटनाकारांचे वचन होते. पण ते पूर्ण होऊ शकले नाही. मोदी सरकारने त्याबाबतचा कायदा करून हिंदू, बौद्ध, शीख आणि जैनांना भारतीय नागरिकत्व द्यायचे ठरवले आहे. हा एक राजकीय जुमला आहे. परदेशात भारतीय वंशांच्या लोकांचा छळ होतोय. त्यापेक्षा जास्त छळ भारतात होत आहे. मोदी काळात हा छळ जास्तच सुरू आहे आणि त्यांचा छळ थांबवण्यासाठी मोदी सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही.”, असे भाष्य संजय राऊतांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!