ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बाल दिनानिमित्त विद्यार्थिनींच्या हस्ते व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरणाचा शुभारंभ

अक्कलकोट, दि.14 : तालुक्यातील युवकांचे व नागरिकांचे आरोग्य सशक्त व सदृढ रहावे यासाठी व्यायाम आणि खेळ या दोन्हीचा लाभ एकाच छताखाली घेता यावे याकरिता नवीन व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण करण्यात आल्याचे मनोगत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. ते सोमवारी प्रसिध्द फत्तेसिंह क्रिडांगणावरील भारत सरकार क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि तालुका क्रिडा संकुल अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन आ. कल्याणशेट्टी हे बोलत होते. दरम्यान बाल दिनानिमित्त कु. अश्विनी राठोड, कु. शिल्पा पवार या विद्यार्थिनीच्या हस्ते व्यायाम शाळा व इनडोअर बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरणाचा शुभारंभ करण्यात आले.

यावेळी तहसिलदार तथा कार्याध्यक्ष बाळासाहेब शिरसट, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, मुख्याधिकारी सचिन पाटील, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका क्रीडा संकुल समिती सदस्य उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, मल्लिकार्जुन आळगी, अमोल कोकाटे, तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, अ‍ॅड. विजय हार्डीकर, विक्रम शिंदे, नन्नू कोरबू, सिद्धाराम जाधव, अमर शिरसाट,अविनाश राठोड आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, अक्कलकोट तालुक्याने क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. ग्राम खेळाडू ते तालुकास्तरीय खेळाडूपर्यंत बॅडमिंटन व व्यायाम शाळेचा निश्चित उपयोग होवून सदर खेळाडू हे राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारतील असा विश्वास आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त करुन या पुढील काळात देखील तालुक्यातील क्रिडा क्षेत्रातकरिता विविध योजना, स्पर्धा, नवीन बोअर, वृक्षारोपण, योग, मुलांसाठी हायजम्प, लाँगजम्प, व्हॉलीबॉल, पोलिस प्रशिक्षणाकरिता लागणारे ट्रॅक, व आवश्यक त्या सुविधा, महिलांसाठी वॉकिंग ट्रॅक याकरिता निधी कमी पडू देणार नाही. तयार करण्यात आलेले बॅडमिंटन कोर्ट अद्यावत करण्यात आलेले आहे. एक अव्वल दर्जाचे क्रिडांगण जिल्ह्यात, राज्यात नावरुपास येईल त्या पध्दतीने विकास करण्यात येईल असे आ.कल्याणशेट्टी म्हणाले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्किटेटर कोंडा, क्रिडाशिक्षक प्रकाश सोनटक्के, प्रा. बिराजदार, कु.नंदिनी नंदे कु.अंकिता उदगीरे, रवींद्र भंडारे, डॉ.सौरभ अळ्ळे, आप्पासाहेब पाटील, लक्ष्मीकांत तळवार, विष्णू शिंपाळे, रेणुक मंगळुरे, महादेव झळके आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्तावना व आभार चंद्रकांत दसले यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!