महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2020-21 चा अहवाल 5 मार्च 21 ला होणार सादर;राज्य शासनाच्या व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर अहवाल उपलब्ध
मुंबई, दि. 4 : राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दि. 5 मार्च 2021 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार हे विधीमंडळात सादर करणार आहेत. पत्रकार व अभ्यासकांसाठी हा अहवाल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in तसेच https://mls.org.in, https://www.maharashtra-gov.in, https://www.finance.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिली आहे.
दरवर्षी राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक दिवस अगोदर ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी’ हे प्रकाशन विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाते. दि.1 मार्च, 2021 पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21 हे प्रकाशन दोन्ही सभागृहांमध्ये दि.5 मार्च, 2021 रोजी सादर केले जाणार आहे.
यंदाच्या वर्षी सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार विधीमंडळात वित्तमंत्र्यांनी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21’ सादर केल्यानंतर पत्रकार तसेच अभ्यासकांसाठी हा अहवाल डिजीटल स्वरुपात वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत.