बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्य जपणे आज मोठे आव्हान बनले आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक जण महागड्या सुपरफूड्सकडे वळताना दिसतात. मात्र, फारसा खर्च न करता आपल्या घरातच उपलब्ध असलेले पारंपरिक पदार्थ शरीरासाठी अमूल्य ठरू शकतात. त्यातीलच एक प्रभावी आणि स्वस्त उपाय म्हणजे भाजलेले चणे आणि मनुके. पौष्टिकतेने भरलेले हे दोन्ही पदार्थ एकत्र सेवन केल्यास शरीराला आतून बळकटी मिळते.
भाजलेले चणे आणि मनुके शरीराला त्वरित ऊर्जा देतात. चण्यांमधील प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स तसेच मनुक्यांतील नैसर्गिक साखर थकवा दूर करून उत्साह वाढवते. फायबरने समृद्ध असलेले भाजलेले चणे आणि मनुके पचनसंस्था मजबूत करतात, बद्धकोष्ठतेपासून दिलासा देतात.
वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठीही हा उत्तम पर्याय आहे. चणे पोट जास्त वेळ भरलेले ठेवतात, त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. गोड खाण्याची इच्छा झाल्यास थोड्या प्रमाणात मनुके सेवन केल्यास वजन नियंत्रणात राहते.
मनुके आणि चणे लोहाने समृद्ध असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि अशक्तपणा कमी होतो. विशेषतः महिलांसाठी हा आहार अत्यंत फायदेशीर ठरतो. याशिवाय मनुक्यातील पोटॅशियम व अँटीऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
चण्यांमधील कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हाडे मजबूत करतात. सांधेदुखी कमी होते. मनुक्यातील व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक चमक देते, तर चण्यांमधील प्रथिने केस मजबूत व दाट करतात.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, मधुमेह नियंत्रणात ठेवणे आणि हार्मोनल असंतुलन कमी करणे हे देखील या मिश्रणाचे मोठे फायदे आहेत. साधे, चविष्ट आणि पौष्टिक असलेले भाजलेले चणे व मनुके सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याला घेतल्यास एकूण आरोग्यात लक्षणीय सुधारणा होऊ शकते.