ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वराज्य ध्वजारोहणाची शिवपट्टण किल्ल्यावर जोरदार तयारी सुरू

मुंबई, दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांची अनोखी संकल्पना असणारा विक्रमी उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज आता लवकरच दसऱ्याच्या दिवशी गगनात झळकेल. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर होणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याबाबत राज्यभरात उत्सुकता वाढीस लागली आहे. कर्जत-जामखेड तालुक्याला नवी ओळख मिळवून देणारा हा स्वराज्य ध्वज अनेकांसाठी आता आदर्श प्रेरणा बनला आहे. महाराष्ट्राच्या शौर्यशाली परंपरेतून जन्मलेल्या, एकतेची-बंधुत्वाची हाक देणा-या व ७४ मीटर अशा विक्रमी उंचीने सर्वांच्या मनात भरलेल्या भगव्या स्वराज्य ध्वजाने थोड्याच दिवसात अथक यात्रेकरवी जनमानसात आणि देशभरातही महाराष्ट्राच्या करारी इतिहासाची ओळख पोहोचवण्यात मोठं योगदान दिलं आहे. ३७ दिवसांचा अहोरात्र प्रवास करत, ९६ शक्तीपीठे आणि प्रेरणास्थळांना वंदन करत, महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व इतर पाच राज्यांना भेट देऊन पुन्हा राज्यात पोहोचलेला हा भगवा स्वराज्य ध्वज आता कायमच उंच झळकून आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्यधर्माची आठवण करून देत राहाणार आहे. दरम्यान खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यासमोर ‘स्वराज्य ध्वज’ उभारणीच्या कार्यक्रमाची लोकसहभागातून जोरदार तयारी सुरू झाली आहे. समानतेचा भगवा स्वराज्य ध्वज उभारण्यासाठी ग्रामस्थ व इतर मंडळींनी जय्यत तयारी सुरू केली आले. किल्ल्याचा परिसर स्वच्छ केला जात असून तिथली जुनी टाकी, विहीरी देखील साफ केल्या जात आहेत. युवावर्गाने उत्साहाने या ध्वजारोहणाच्या निमित्ताने होणा-या स्वच्छता मोहिमेत अत्यंत उत्साहाने भाग घेतल्याचं चित्र दिसत आहे.
हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ रोजी झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६X६४ फूट आहे. ध्वज स्तंभाचे वजन १८ टन असून नुसत्या ध्वजाचे वजन ९० किलो आहे. साडे पंचावन्न हजार चौरस फूट आकार असलेला हा ध्वज देशात सर्वांचे आकर्षण ठरला आहे. असा हा मंगल ध्वज कर्जत-जामखेडवासियांसाठी सध्या अभिमानाचा विषय आहे. ध्वज प्रतिष्ठापना आणि ध्वजारोहणाच्या निमित्ताने या किल्ल्याची डागडुजी केली जात आहे. या किल्ल्याची निर्मिती सरदार राजे निंबाळकर यांनी १७४३ साली केली होती. इ.स १७९५ मध्ये अहमदनगर जवळ खर्डा या ठिकाणी हैदराबादच्या निजामाला मराठ्यांनी पाणी पाजले. हि अखेरची शौर्यगाथा याच शिवपट्टण किल्ल्याच्या परिसरात लिहिली गेली. हा ऐतिहासिक किल्ला जामखेड जवळ खर्डा या ठिकाणी आजही भरभक्कम अवस्थेत उभा आहे. अभेद्य तटबंदी असणारा हा किल्ला सहा खणखणीत बुरुजांनी संरक्षित आहे. आता येत्या दस-याला अवघ्या राज्याचं नवं स्वप्न असणा-या या भगव्या स्वराज्य ध्वजाची सन्मानाने दिमाखदार प्रतिष्ठापना होईल आणि पुन्हा एकदा या किल्ल्यासमोर नवा विक्रमी इतिहास रचला जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!