ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोहित पवारांची पोस्ट जोरदार चर्चेत ; आता अजित पवारांचा नंबर !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडी व महायुती सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवारांनी जोरदार घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची मुख्यमंत्री कार्यालयात ‘मुख्य आर्थिक सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु असून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केली आहे, असं रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हंटल आहे.

रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केलेली आहे. यापुढे अर्थ खात्याचे सर्वच धोरणात्मक निर्णय आणि पर्यायाने सर्वच प्रशासकीय निर्णय सुद्धा मुख्य आर्थिक सल्लागारांच्या पर्यायाने मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतील. गेल्या अडीच वर्षात घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेत आधी एकनाथ शिंदेच्या खात्यांमध्ये घुसखोरी केली, आता अजित पवारांचा नंबर आहे, असं रोहित पवार म्हणाले.

पुढे म्हणाले, विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्याने त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार नेमण्याचा निर्णय देखील त्याच कार्यपद्तीचा भाग आहे. लोकशाहीत सत्तेचे विकेंद्रीकरण आणि टीम वर्कचा रिझल्ट नेहमीच केंद्रीकृत सत्तेपेक्षा चांगला राहिला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यपद्धतीत बदल करणे महाराष्ट्राच्या हिताचे राहील, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

राहिला प्रश्न मित्रपक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय’ एवढाच अर्थ आहे, त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणाऱ्या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही, हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!
Join WhatsApp Group