अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वन-डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्टइंडीजला ३-० अशी धूळ चारली आहे. काल रंगलेल्या तिसर्या वन-डे सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाला ९६ धावांनी पराभूत केले.
वेस्ट इंडीज संघावर क्लीन स्वीप करीत विजय मिळवण्याचा इतिहास रोहित सेनेने या वन-डे मालिकेत रचला आहे. धडाकेबाज ८० धावा नोंदवणारा मुंबईकर श्रेयस अय्यर आणि नंतर विंडीजला झटपट गुंडाळणारे सिराज, प्रसीद्ध आणि चहर हे वेगवान त्रिकूट टीम इंडियाच्या या शानदार विजयाचे शिल्पकार ठरले.
तिसर्याि आणि अखेरच्या वन-डेत रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ५० षटकांत भारतीय संघाचा डाव २६५ धावांवर आटोपला. आघाडीची फळी झटपट तंबूत परतल्यावर श्रेयस अय्यर (१११ चेंडूंत ८०) आणि ऋषभ पंत (५४ चेंडूंत ५६) यांनी धडाकेबाज अर्ध शतके ठोकली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ १६९ धावां पर्यंतच पोहोचू शकला. प्रसीध कृष्णा, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज या भारतीय वेगवान त्रिकुटाने जबरदस्त गोलंदाजी करत सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकवला.