अक्कलकोट, वृत्तसंस्था
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या कोट्यातून रिपाईं (आठवले) गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना राज्य मंञी मंडळात मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष करावे, अशी मागणी रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.
२०१४ पासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती सोबत रिपाईने खांद्याला खांदा लावून सत्ता आणण्यासाठी जिवाचे रान केले आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून सव्वा वर्ष कालावधी भेटला होता. या कालावधीत राज्यातील दलित मागासवर्गीय बांधवांना एक लाख ते पाच लाखापर्यंत थेट कर्जाचे वाटप करुन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम महामंडळाच्यावतीने महायुती सरकारच्यावतीने केले.
राज्यातील उपेक्षितांना, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पुन्हा एकदा मंञी किंवा महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ देऊन रिपाईंचा उचित सन्मान करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे व जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी आठवले यांच्याकडे केली आहे.
यावेळी दुधनी शहराध्यक्ष गोरखनाथ धोडमनी, आंदेवाडीचे सरपंच रमेश धोडमनी, आदीसह मुंबई येथील सिद्राम ओहळ, सिध्दु कांबळे आदी उपस्थित होते.