सचिन पवार
अक्कलकोट, दि.२० : खराब रस्त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कल्लप्पावाडी रस्त्यावर एसटी पलटी झाली आणि या अपघातात बसमधील सात जण
जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. खराब रस्त्यामुळे वारंवार अशा प्रकारचे छोटे अपघात तालुक्यात होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एसटी प्रवासी
घेऊन परमानंद तांडा ते अक्कलकोट दरम्यान ही बस धावत होती. कल्लाप्पावाडी गावाजवळ ही घटना घडली.यामध्ये ४० ते ४५ प्रवासी होते.या दरम्यान खराब रस्त्यामुळे चालकाचे स्टेरिंगवरचे नियंत्रण सुटले आणि बस खाली खड्ड्यात कोसळली.त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच हाहाकार उडाला.या अपघातात बस पूर्णपणे पलटी झाली आहे.
एसटी क्रमांक एम एच १२ इ एफ ६४९८ ही एस टी बस पलटी झाली आहे. या अपघातात वैजयंती बनसोडे (वय – ३५), ओंकार बनसोडे (वय -१३), भाग्यश्री बनसोडे (वय -२६), कस्तुरबाई बनसोडे (वय -६५),सुनीता पवार (वय ४३), रमा पवार (वय -५६ ) अशी जखमींची नावे आहेत.केवळ खराब असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही,असे नागरिकांचे म्हणणे आहे. किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत.
रस्त्यात जागोजागी पाणी साचलेले असते खड्ड्यांचा अंदाज लागत नाही. त्यामुळे असे अपघात होत आहेत.अशा प्रकारचे रस्ते त्वरित दुरुस्त करून घ्यावे,अशी मागणी होत आहे.तालुक्यात असे अनेक रस्ते खराब आहेत.या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते दुरुस्त करून घ्यावेत,अशी मागणी नागरिकांतून
होत आहे.