नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर तब्बल 673 दिवसांनी आज राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिजीत मुहूर्तावर शिखरावरील 161 फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करणार असून हा क्षण मंदिर पूर्णत्वास गेल्याचे प्रतीक मानले जाणार आहे. पंतप्रधानांचे विमान अयोध्या विमानतळावर पोहोचले असून तेथून ते लष्करी हेलिकॉप्टरने साकेत कॉलेजकडे रवाना झाले आहेत.
साकेत कॉलेजपासून रामजन्मभूमीपर्यंत दीड किलोमीटरचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रामपथातील 1 किमी भाग 8 झोनमध्ये विभागला असून प्रत्येक झोनमध्ये स्वयं सहायता गटातील महिला पारंपरिक थाळी, आरती आणि फुलांनी पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत.
अभिजीत मुहूर्त : दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान बटण दाबताच 2 किलो वजनाचा भगवा ध्वज मंदिराच्या शिखरावर फडकू लागेल. या कार्यक्रमाला सुमारे 7 हजार उपस्थित राहणार आहेत. शहराला सजवण्यासाठी तब्बल 1000 क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संघप्रमुख मोहन भागवत सोमवारीच अयोध्येत दाखल झाले आहेत.
या सोहळ्यास उद्योग, क्रीडा, साहित्य, बॉलिवूड क्षेत्रातील जवळपास 1 हजार VVIP पाहुणे उपस्थित राहणार आहेत. मंदिर बांधणीत 2 कोटींहून अधिक देणगी देणाऱ्या 100 देणगीदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, शंकराचार्यांना आणि अयोध्येचे सपा खासदार अवधेश प्रसाद यांना निमंत्रण मिळालेले नाही. याबद्दल प्रतिक्रिया देताना प्रसाद यांनी म्हटले. “मला बोलावले असते तर मी अनवाणी पायांनी धावत गेलो असतो.” राम मंदिरावर लागणारा नवा धर्मध्वज भयानक वादळातही सुरक्षित राहील अशा पद्धतीने तयार करण्यात आला आहे. हवा बदलल्यावर तो न अडकता फिरत राहील. ध्वजस्तंभावर 21 किलो सोने मढवले असून हा ध्वज 4 किलोमीटर दूरूनही स्पष्ट दिसणार आहे. अयोध्या पुन्हा एकदा ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहे.