साई संस्थानाचे विदेशी चलनाचे खाते गोठवले, “या” कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न आल्याने कारवाई
शिर्डी : साईसंस्थानचे विदेशी चलनाचे खाते १ जानेवारी पासुन गोठवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडील विदेशी योगदान नियमन कायद्यानुसार खात्याचे वेळेत नुतनीकरण करण्यात न आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे साई संस्थानाचे लाखो रुपये अडकून पडले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एफसीआरए कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत खात्याचे नुतनीकरण न केल्याने देशातील जवळपास सहा हजार व महाराष्ट्रातील १२६३ अशासकीय संस्थांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये साईसंस्थानसह तिरूपती देवस्थानाचाही समावेश आहे. सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना विदेशातून आर्थिक मदत मिळते. खाती गोठावण्यात आल्याने मदतीचा ओघ थांबला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने विदेशी चलनाबाबत कायद्यात बदल केले आहेत. त्यानुसार गेल्या जुलै महिन्यापासून परकीय चलनाबरोबरच दात्याचा ओळखीचा पुरावाही सादर करावा लागतो. अनेकजण ती देण्यास टाळाटाळ करतात. याशिवाय अनेक विदेशी चलनाचे चेक पोस्टाने येतात. अनेक देणगीदारांनी असा पुरावा सादर करण्यास नकारही दिल्याचे कळते. विशेष म्हणजे दानपेटीतही मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन निघत असते. या चलनाचा दाता निश्चीत करणे अवघड असल्याने या चलनाचे काय करावे, असा प्रश्न संस्थान समोर आहे.
साईसंस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे होता. पदाधिकाऱ्यांची केवायसी उपलब्ध न झाल्याने नुतनीकरण रखडल्याचे सांगण्यात येत आहे. नवीन व्यवस्थापन आल्यानंतर सर्व विश्वस्तांची केवायसी करून 25 डिसेंबरला संस्थानने नुतनीकरणासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु, आयबीकडून पडताळणी प्रलंबित असल्याने संस्थानचेही खाते गोठवण्यात आले. लवकरच हे खाते कार्यान्वित होईल असे विश्वसनीय सुत्रांकडून सांगण्यात आले.