ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एसटी कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ; निलंबनही तातडीने रद्द होणार परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा

मुंबई :राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या १५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटावा यासाठी पगारवाढीची देखील घोषणा केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली होती. यावर शरद पवार यांनी वेतनवाढ करण्याबाबत सूचना मंत्री परब यांना दिल्या होत्या. तसेच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत तरतूद करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

त्यानुसार आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि एसटी कर्मचाऱ्यांचा शिष्टमंडळ यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनंतर पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला.

अनिल परब म्हणाले कि, जे कर्मचारी सेवेत एक वर्ष ते दहा वर्ष या कॅटेगिरीत आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट ५ हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचं मुळ वेतन १२ हजार ८० रुपये होतं त्याचं आता १७ हजार 395 जालं आहे. त्याचं पूर्ण वेतन १७ हजार ३९५ होतं ते आता २४ हजार ६९४ झालं आहे. म्हणजे ७ हजार २०० रुपयांची वाढ पहिल्या कॅटेगिरीच्या कर्मचाऱ्यांसाठी केली आहे. पहिल्या कॅटेगिरीतील कर्मचाऱ्यांमध्ये पगाराबाबत नाराजी होती. त्यांचा आक्रोश गेल्या काही दिवसांमध्ये दिसला. त्यामुळे त्यांच्या पगारात फार मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पगारवाढीपैकी ही एक मोठी वाढ आहे. जवळपास ४१ टक्के ही पगारवाढ करण्यात आली आहे”, अशी घोषणा अनिल परब यांनी केली. यावेळी संप मागे घेणार का, असा प्रश्न पत्रकारांना विचारला असता आंदोलकांशी चर्चा करून सांगणार, असे उत्तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे, अशी घोषणा करतानाच मंत्री परब यांनी एसटीचे नुकसान वाढत आहे, कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले. कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर संप मागे घेतला नाही तर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री परब यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!