अक्कलकोट, दि.१६: जिल्हा परिषद प्राथमिक मराठी सलगर (ता.अक्कलकोट ) शाळेच्या वतीने दोन विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली.त्यांच्या या सामाजिक बांधीलकीबद्दल कौतुक होत आहे. कु. अवनी अतुल नकाते (इयत्ता ४ थी) आणि कु. निरज अतुल नकाते (इयत्ता १ ली) या दोन्ही चिमुकल्यांना आजार असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. मुख्याध्यापक दत्तात्रय पोतदार यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्या दालनात जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्व शिक्षक वृंदांनी जमा केलेली रक्कम ५ हजार १ रुपये, प्रज्ञा देसाई यांचे ५ हजार १ रूपये, जयश्री पोतदार यांचे १ हजार ५०० रूपये आणि कुदसिया शेख यांचे १ हजार असे मिळून १२ हजार ५०२ रुपयेची मदत अतुल नकाते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
याप्रसंगी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी शाळेच्या पुढारकारातून राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. गट शिक्षणाधिकारी शेख यांनी आपला आदर्श घेत इतर शाळा देखील मदत करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी उमेश काटे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रशांत आरबाळे, हरीशचंद्र गायकवाड, जाफर मुल्ला, भीमाशंकर वाले, केंद्रप्रमुख इस्माईल मुर्डी, ग्रामविकास अधिकारी प्रदिप तोरसकर, हणमंतराव गुंडरगी, मल्लिनाथ चनपटणे, दिनकर भारती आदी उपस्थित होते.