मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी उपोषण सुरु असून आज सोमवारी त्यांच्या उपोषणाला सातवा दिवस असून त्यांची प्रकृती देखील खालावली असतांना नुकतेच स्वराज्य संघटनेचे नेते संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी राज्य सरकारला दिला.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. सोमवारी त्यांच्या आंदोलनाच्या 7 व्या दिवशी संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मनोज जरांगेंची प्रकृती ढासळल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यांच्या प्रकृतीस काही अपाय झाला तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, ही काय पद्धत आहे? तिकडे (सरकारकडे) मेडिकल रिपोर्ट जातो. मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे. काहीही होऊ शकते. जरांगेंची प्रकृती बिघडली तर त्याला तुम्ही जबाबदार असाल.
मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना उठावे-बसावे लागत आहे. तसेच त्यांनी सातव्या दिवशी सुद्धा उपचार घेण्यास नकार दिला आहे. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेत विचारपूस केली आहे. तसेच त्यांनी डॉक्टरांकडे देखील मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या मराठा ओबीसी आरक्षण मुद्दा तापलेला असताना ओबीसी नेत्यांकडून आरोप होत असताना संभाजीराजे छत्रपती जालन्यात मनोज जरांगे यांच्या भेटीला आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार असून आता मराठा आरक्षणावर सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. तुम्ही सत्तेत बसला आहात. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकार कसे आरक्षण देणार आहे यावर भाष्य करायला हवे आहे. हे आरक्षण कसे टिकणार यावर बोलायला हवे, असे ते संभाजीराजे यावेळी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला, अठरापगड जातींसह बारा बलुतेदारांना न्याय दिला. त्यामुळे जे शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेतात त्या सरकारने सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असा सल्ला संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला दिला आहे.