नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची प्रतिभावंत माजी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यांच्या घटस्फोटावर अखेरीस शिक्कामोर्तब झाले. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत निकाह केल्याचे छायचित्र समाजमाध्यमांवर शनिवारी प्रसारित केले. मात्र या दोघांचा मुलगा इजहान कोणासोबत राहणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
शोएब आणि सानियाने २०१० मध्ये निकाह केला होता. त्याआधी दोघे पाच महिने एकमेकांच्या संपर्कात होते. भारत आणि पाकिस्तानच्या या शेजारील राष्ट्रांच्या खेळाडूंमधील प्रेमप्रकरण आणि निकाह त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून दोघांमध्ये बिनसले होते. सानियाच्या टेनिस विश्वातील निवृत्तीच्या क्षणी शोएब गैरहजर होता. तसेच समाजमाध्यमांवर दोघांनीही एकमेकांची साथ सोडली होती. त्यानंतर या दोघांकडून आपल्या नात्याबाबत गुप्तता पाळण्यात येत होती. अखेरीस शोएबच्या निकाहानंतर सर्व प्रश्नांचा उलगडा झाला. दोघांनी सहमतीने घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर त्यांचा मुलगा इजहान दुबईत राहणार आहे. दोघे मिळून त्याच्या संगोपनाचा सर्व खर्च उचलतील, असे समजते.